एडशब्द का आरोग्यसेवा?

19 मार्च ला शिवसेना कार्यकर्त्यांनी केईएम रुग्णालयासमोरील इंग्रजीतील एका कमानीला काळे फासले.

19 मार्च ला शिवसेना कार्यकर्त्यांनी केईएम रुग्णालयासमोरील इंग्रजीतील एका कमानीला काळे फासले. माफ करा, त्यांपैकी कोणी वाचायच्या आधी रूग्णालयाचे नाव रा. ए. स्मा. असे घेतलेले बरे. (राजे एडवर्ड स्मारक – कदाचित फडण दोन-शून्य यांच्या राज्यात एडशब्द पण म्हणावे लागेल, कोणास ठाऊक)

याप्रसंगी कोणता विचार पहिले येइल, अशी मनात पैज सुरू आहे. पैकी काही मांडू इच्छितो.

आमदार-खासदारांच्या शिफारशी घेऊन रांग तोडतांना, आम्ही व्हीआयपी आहोत हे सांगतांना कुठे जाते यांचे मराठीप्रेम? आणि प्रेम काय फक्त भाषेपुरतं? भाषा बोलणाऱ्या लोकांची नाही काही काळजी? देशभरातील विद्यार्थी, अध्यापक, प्रशासकीय अधिकारी – नर्स-डॉक्टर पासून शिपाई, लिपिक ते अधिष्ठात्यांपर्यंत – हे दिवसरात्र मुंबईत रुग्णसेवेत लागले असतात. ते लोकांची भाषा विचारून नाही ठरवत उपचार करावा का नाही ते. त्यांच्या कामात स्वतःच्या हट्टापायी व्यत्यय आणून मराठी लोकांच्या पण आरोग्य सेवा नाही का खोळंबत?

रा.ए.स्मा. रुग्णालय देशभरातच नाही तर जागतिक पातळीवर ओळखलं जातं. दुर्मिळ रक्तगटाचा शोध लावणे, कैक अद्ययावत प्रक्रियांची देशात सुरुवात करणे असा वारसा या रूग्णालयाचा. राज्यातील कित्येक होतकरू विद्यार्थी येथून घडलेत आणि आज नामांकित चिकित्सक, शल्यतज्ञ, संशोधक आहेत. त्यांच्या कामाने मराठी भाषिकांची अस्मिता वाढते, कमी नाही होत.

गेल्या काहीच महिन्यांत कोरिया, इटली इ. देशातील वैद्यकीय चमू येथे येवून गेल्या. त्यांच्याशी ट्रांस कॅथेटर आर्टेरियल व्हाॅल्व रिप्लेसमेंट किंवा बलून माईट्रल व्हाल्वूप्लास्टी बद्दल मराठीत काय चर्चा झाली असती याची कल्पनाच योग्य.

शेवटी, या प्रकरणातून राजकारणाचा दुटप्पेपणा जखमेत मिठासारखा जाणवतो. देशातील सर्वात धनाढ्य नागरी संस्थेच्या रुग्णालयांमध्ये पैशांच्या अभावी, कर्मचाऱ्यांच्या अभावी, उपकरणांच्या अभावी रूग्णांसमोर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांसमोर रोजचा ससेमिरा उभा असतो. फावला वेळ असेल तर त्यांना मदत करावी. ठाकरे आणि वल्ली आपल्या मुलामुलींना कुठल्या मराठी शाळा-कॉलेजला पाठवतात? नागपूरला उपद्रव्यांकडून वसुली घेण्याचे वचन देणारे मुख्यमंत्री वैद्यकीय सेवेत अडथळा आणणाऱ्या उपद्रव्यांकडून वसुली घेतील काय?

– आनंद कुळकर्णी
सदर रुग्णालयाच्या सेवेत रुजू एका हृदयरोगतज्ज्ञाचा वैवाहिक भागीदार

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *